आरोग्याची गुरुकिल्ली

आरोग्याची गुरुकिल्ली     

                  –  प्रमोद पोतनीस, जत

प्रत्येक सुखाची किंमत मोजावी लागते म्हणतात. आज २१ व्या शतकात माणसाच्या अलौकिक बुद्धीमत्तेतून वैज्ञानिक क्रांती झाली आहे. क्षणाक्षणाला नवीन ज्ञान आणि ज्ञानशाखा निर्माण होत आहेत. नवे शोध लागत आहेत. सर्वच क्षेत्रात अमुलाग्र झालेल्या बदलांमुळे माणसाचे जीवन सुखाचे झाले आहे. अर्थातच सुखाचे हा शब्द मी धाडसाने वापरला आहे. कारण सुखासीन जीवन शारीरिक हालचालींवर बंधने आणत आहे. आणि परिणामी शरीरस्वास्थ्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विविध ताणतणावांनी मानसिक शांतता ढळत आहे. आणि वयाच्या ऐन उमेदीच्या काळातच मधुमेह , रक्तदाब सारख्या विकारांचा प्रादुर्भाव जाणवतो आहे. सगळीकडे धावायला वेळ आहे, फक्त स्वतःकडे पाहायला मात्र सवड नाही. म्हणून कधी नव्हे इतका ‘आरोग्याचा’ प्रश्न महत्वाचा , गांभीर्याने विचार करण्यासारखा झाला आहे.  खरतर ‘ आरोग्य ‘ ह्या विषयावर लिहायला मी काही डॉक्टर नाही , योगगुरू नाही किंवा आरोग्य गुरूही नाही. तेव्हा हे काही लिहिण्याबाबत मी काही असा अधिकारी पुरुष नाही.
पण आज माझे वय ७२ + आहे . गेली अनेक वर्षे ( ४० + ) मी सातत्याने बॅडमिंटन खेळतो. तसेच काही योगासन प्राणायाम करतो. मधुमेह ( गेली १६ वर्षे ) आणि रक्तदाब हे साथीदार आहेत , control  मध्ये आहेत. गोळ्या चालू आहेत पण वरील सर्व व्यायाम , चालणे (दोन एक किलोमीटर दररोज) व्यवस्थित चालू आहे. विशेष म्हणजे अध्यात्मिक गुरु कृपान्वित असल्याने व साधनेत सातत्य असल्याने मन प्रसन्न आहे. आणि तेच खरे माझ्यातरी निरामय आयुष्याचे एकमेव कारण आहे असे मी मानतो.
या आधारांवरच आरोग्य या विषयावर काही लिहायचे धाडस करतो आहे. वस्तुतः हे स्व अनुभवाचे प्रकट चिंतन आहे.

शरीरमा‍‌द्यं खलु धर्मसाधनम् |
असे एक प्रसिद्ध वचन आहे आणि ते सर्वार्थाने खरं आहे. धर्म या शब्दाचे जे अनेक अर्थ आहेत त्या पैकी ‘विहित स्वकर्म’ हा अर्थ गीतेने प्रतिपादलेला आहे. श्री संत बसवेश्वरांनीही ‘कायकवे कैलास’ ( कर्म हाच मोक्ष ) असे म्हंटले आहे. या अर्थाने धर्म पालन सुव्यवस्थितपणे आचरण्यासाठी शरीरस्वास्थ्य अत्यंत महत्वाचे आहे . उत्तम आरोग्य हाच सुखी , आनंदी जीवनाचा मूलमंत्र आहे यात संशय नाही.
मी आरोग्याबद्दल बोलत असताना मला केवळ शरीराचे आरोग्य अभिप्रेत नाही. आरोग्य हे मनाचे , बुद्धीचे आणि त्यायोगे शरीराचे असे मला वाटते. म्हणून शारीरिक आरोग्याबरोबरच किंबहुना सर्वप्रथम मनाचे आरोग्य चांगले , निकोप , स्वच्छ राखणे गरजेचे आहे.
मन करा रे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण
असे संतांनी म्हंटले आहे. तसेच अगदी एकशे एक टक्के मी म्हणेन की समर्थांचे मनाचे श्लोक जर मन आणि अंतःकरणपूर्वक आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आणि समर्थांचे उपासनेचे दैवत श्री हनुमंताचा आदर्श जीवनात ठेवला तर कोणत्याही बाह्योपचारांची आवश्यकता कोणाला भासणार नाही.
हे प्रयत्न सर्व वयांमध्ये आवश्यकच नव्हे तर अत्यावश्यक आहेत .  लहानपणीच लवकर पहाटे ( अमृतवेळ ) उठण्याची सवय ( आज हे कठीण वाटते , पण तेच अंतिम हिताचे आहे ) यासाठीच आई वडिलांनीच स्वतःमध्ये हा बदल करायला हवा . गजर लावून लवकर उठण्याची सवय लावली व ती कटाक्षाने पाळली तर तो दिवसातला पहिला विजय ठरेल आणि मग दिवसभराचे काम ही त्या दिवसाची यशोगाथा होईल . ज्यानं जाग आणली त्या ( देवाला ) वंदन करून, ब्रश करून काही व्यायाम करणे , आणि नित्याचे व्यवहार करणे. सायंकाळी किहीही वेळ होवो देवाला नमस्कार करून इतर व्यवहार ( अभ्यास वगैरे )ची सवय लावून घेणे, हे सातत्याने केले तर मन आणि त्यायोगे शरीर प्रसन्न राहील.
तरुणपणी तर मनाचे आरोग्य चांगले राखणे आजच्या पिढीला नितांत आवश्यक आहे. विविध शोधांनी जीवन जेवढे सुकर झाले आहे , तेवढ्याच समस्या वाढलेल्या आहेत . ताणतणाव वाढले आहेत. असुरक्षितता वाढली आहे . दूरदर्शनवरील तणावपूर्ण मालिकांनी मने अस्वस्थ होत आहेत . रहदारी , नोकरीतील धावपळ , तासनतास संगणक , मोबाईल यांमुळे स्वतःकडे पाहायला वेळ नाही. आपण वेळ देत नाही ( कसा वेळ देणार ? अशी उत्तरे शोधली जात आहेत ) परिणामी शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत . पैसा , सुखसाधने अलोट आहेत , पण at what cost ?  यासाठी मन शांत राहणे व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा ज्या सुखासाठी हि सारी धावपळ , ते उपभोगण्यासाठी शरीर आणि मन तयार नसेल , तर त्याचा काय उपयोग ?
वार्धक्यात तर मन शांत राखणे फार मोलाचे. आता आपण back benchers आहोत. लागेल तेथे , मागतील तेव्हा सल्ले देणे , तरुण पिढीला संधी देणे , वाव देणे , त्यांच्या विचारानुसार त्यांना नवीन घडवू देणे ( अगदी राजकीय क्षेत्रातही ? ) याचे भान ठेवणे गरजेचे आहे. तरुणांनी जेष्ठांच्या वयाचा शरीराबरोबर मनाच्या विकालांगतेचा विचार करणे , आपणही वृद्ध होणार आहोत याची जाणीव ठेवणे आणि जेष्ठांनी आपले आशिर्वादांचे कृपाछत्र कायम ठेवणे यातूनच निरामय आयुष्य सर्वांनाच जगता येईल . थोडक्यात प्रत्येक विधान करताना , वागताना ‘आपण त्याजागी असतो तर’ एवढा एकच विचार आपल्याला मार्गदर्शक होईल.
ही नाण्याची एक बाजू झाली याचे मला भान आहे. पण असे वागूनही शरीरस्वास्थ्य राहिले नाही तर ? आता मला वाटत याचीही चिंता वाटायचे कारण नाही. वैद्यकीय शास्त्रांनी एवढी क्रांती केली आहे. आणि एवढी तज्ञ मंडळी या क्षेत्रात आहेत की, त्यांनी निरामय आयुष्य मानवतेला मिळवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. विविध औषध कंपन्यांनी तयार केलेली  औषधं , उपकरणं आणि संगणकीय उपलब्धतेनं कोणत्याही ( Almost ) आजारावरील प्रभावी उपाय योजना उपलब्ध आहे.
या निरामयतेला सरकारी सहाय्याची गरज आहे. सरकारी दवाखाने , त्यातील साधन सामुग्री , डॉक्टर्स , औषधं आणि इतर सोयी शासनानं उपलब्ध केल्या आहेत. तरीही कुपोषण , भृणहत्या, महागडी औषधं आणि ज्यांना तपासणीसाठी जाणंही शक्य नाही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. मोफत सोयींची उपलब्धता हि आज काळाची गरज आहे. शेवटी कोणत्याही वयात क्रोध आवरणे, खाण्यापिण्यावर बंधन ठेवणे, नियमित व्यायाम करणे सकारात्मक दृष्टी नि प्रसन्न राहणे. काम, क्रोध आदि सहा शत्रू दूर करणे व सुहास्य वदन , प्रसन्न दर्शन, निर्मळ अंतःकरण, मितमधुभाषण , शुद्ध मन , सदैव सत्याचरण हे सहा सद् गुण अंगीकारणे यातच निरामय जीवनाचे मर्म सामावले आहे हे ध्यानी घ्यावे.
निरामय जनता ही राष्ट्रीय संपत्ती आहे. राष्ट्राचे भूषण आहे.
‘हे विश्वची माझे घर’
ही कविकल्पना अगर स्वप्न नव्हे. ही आपली संस्कृती आहे म्हणून निरामय आरोग्यासाठी आपण प्रार्थना करू.
सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ||

– प्रमोद पोतनीस
सेवानिवृत्त प्राचार्य
‘त्रिपदा’ विद्यानगर जत.
जिल्हा: सांगली ४१६ ४०४
फोन : ०२३४४ २४६१०४ , ९६०४८८९१६८  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *